Wednesday, March 19, 2014

फुलं

            लोकांच्या  आयुष्यात प्रसंग येतात . माझ्या आयुष्यात फुलं आली. आणि या फुलांच्या अनुशंगाने प्रसंग आले. इतके की माझ्या आजवरच्या आयुष्यातीलअनेक मोहक प्रसंगांची आठवण मला केवळ या फुलान्मुळेच होते . फूल - एक क्षण डोळे मिटून विचार केला तर तो विचार देखील नकळत नाजूक होऊन जातो नाई.

            चाफा - 
           

            आमच्या बागेत एक चार मजली इमारती इतकं उंच आणि भव्य असं चाफ्याचं झाड होतं. पावसाळ्याचा season आला कि त्याला भरभरून फुलं लागायची . इतकी की झाडावरची पानं दिसेनाशी व्हायची . माझा सकाळी उठल्या उठल्या पहिला कार्यक्रम म्हणजे झाडावर चढून देवपूजेसाठी फुलं काढणे . वाड्यातल्या गोट्याला खाली परडी घेऊन उभा करायचं आणि वरून फुलं फेकायची. अनेकदा आजोबा खालून ओरडायचे - भडवे , अंघोळ न करता फुलं काढू नकोस . पण मी ऐकून न ऐकल्यासारखं करायचे. पुरेशी फुलं काढून झाली की मी तशीच झाडाच्या फांदीवर थोडावेळ बसून रहायचे. उरलेल्या फुलांकडे मन लावून बघत. आईची हाक ऐकू आली की भानावर येउन खाली उतरायचे . नंतर आजोबांनी मोजून केलेल्या फुलांच्या वाटण्या मी वाड्यात प्रत्येकाच्या घरात देऊन यायचे. वर्षभर काही फुलं लागायची नाहीत . त्यामुळे मला असं वाटायचं की त्या चाफ्याच्या झाडाकडे दुर्लक्ष होतंय . म्हणून मी पुस्तक घेऊन त्याच्या फांदीवर बसून अभ्यास करायचे. पोत्याचा वापर करून मी माझं आपलं एक छोटंसं घर त्या चाफ्यावर बांधलं होतं. आज चाफ्याचा वास घेतला कि मला त्या घरात गेल्यासारखं वाटतं. 

            सायली - 
            

           याला जाई जुई चमेली अशी अनेक लोकं अनेक नावं वापरतात. मी मात्र याला सायली म्हणते . आमच्या बागेत एका दरवाज्याच्या आकाराच्या लोखंडाच्या कमानीवर सायलीचा वेल लावला होता . याला  सुध्धा पावसाळ्यात बहर यायचा . हे फूल इतकं काही नाजूक असतं की तोडतांना अलगद बोटांचा वापर करायला लागायचा . सकाळी उठलं की या फुलांचा सडा पडलेलाच असायचा . मग स्वयंपाकघरातून एक ताटली घ्यायची , त्यात फुलं वेचायची , आणि शेजारच्या कुटे मामींकडे देऊन यायची . मी शाळेसाठी तयार होईपर्यंत त्या माझ्यासाठी सायलीचा गजरा ओवायच्या. हा गजरा मी माझ्या छोटाश्या केसांमध्ये पिनेने असा लावायचे कि तो अर्धानिम्मा डोळ्यांवर आला पहिजे. मग सारखी अशी मान उडवत त्याला मागे करायची मला सवय होती . आई सांगते कित्येकदा गजरा नसला की मला शाळेत जाऊ वाटायचं नाही . सायलीचा गजरा दिसला नाही की शाळेतल्या बाई देखील विचारायच्या - आज उठायला उशीर झाला वाटतं ! घरी येईपर्यंत तो कोमेजायचा . पण मला काढवायचा नाही . आज सायली चा वास घेतला की माझी मान नकळत थोडी तिरकी होते आणि मग आजूबाजूच्या लोकांना कळू नये म्हणून मी डोळे मिटून मनातल्या मनात एक झटका देऊन मान उडवते. 

            गुलबक्षी - 
            

            आमच्या पेठेत बऱ्याच लोकांच्या अंगणात गुलबक्षी ची रोपं असायची. आपोआप उगवलेली .त्याच्या काळ्या बिया इकडे तिकडे पडल्या की  ती झुडुपं अजून वाढायची. त्याला पांढरी , गुलाबी, नारिंगी , पिवळी अशी अनेक रंगांची फुलं यायची.  ही फुलं सुवासिक नव्हती पण प्रचंड आकर्षक होती . शेजारच्या रिंकी ने मला सुईदोरा न वापरता त्या फुलांची माळ ओवायला शिकवली होती . रिंकी मला भेटल्या भेटल्या पाठीत दणका देऊन अपिंगो करायची - काहीतरी आमचा लहानपणीचा खेळ . असो ! तर पेठेत फिरून रंगबिरंगी फुलं गोळा करून त्याची सुंदर माळ बनवून मी आमच्या गणपतीला वाहायचे . बाबांना ती माळ फार आवडायची . आजकाल ज्यांच्याकडे गुलबक्षी ची फुलं दिसतात त्यांना मी तशी माळ बनवायला नक्कीच शिकवते.

            सोनटक्का - 
            

            का कोणास ठावूक पण लहानपणी या फुलांना मी 'हत्तीची फुलं' असं म्हणायचे. त्याचा देठ हत्तीच्या सोंडेसारखा लांबसडक असतो म्हणून असावं. लांबड्या हिरव्या देठाच्या टोकाला नाजूक पांढऱ्या पाकळ्या आणि त्याचा वास जणू काही स्वर्गातूनच यायचा. माझ्या शाळेच्या रसत्यात सोनटक्कयाचं एक झाड होतं . ही झाडं फार उंच असतात. म्हणून रसत्यावर पडलेली फुलं उचलण्यापलीकडे माझी मजल जायची नाही . कधी कधी टवटवीत फूल न सापडल्याने मला  गाड्यांच्या चाकाखाली चेम्ब्लेली फुलं उचलल्याच देखील आठवतंय . तो वास माझ्या नाकात असा काही बसलाय की आज ते फूल १० मीटर अंतरावर असलं तरीही मी क्षणातच माझ्या शाळेच्या त्या रस्त्यावर पोचते. 

            रातराणी - 


            म्हणे रातराणी च्या वासाला साप आकर्षित होतो . तसे आमच्या बागेत बर्याचदा साप दिसायचे  . पण म्हणून रातराणी छाटून टाकावी हे काही मला पटलं नव्हतं. यिव्लुस्स ते फूल पण काय त्याच्या वासाची झेप . उन्हाळ्यात गरम व्हायचे म्हणून आम्ही टेरेस वर झोपायचो - चांदणं बघत . त्या बागेतल्या पलीकडच्या कोपऱ्यातून तो रातराणीचा वास पार आमच्या टेरेस वर यायचा . बाबांनी रेदिओ वर लावलेल्या "त्या फुलांच्या गंधकोशी " ऐकत आणि रातराणी चा वास घेत कधी झोप लागायची कळायचंच नाही . आजकाल झोप येत नसेल तर रातराणी आणि आकाशातले तारे यांची मला हमखास कमी भासते.

           या लेखात मी जगभर अस्तिवात असणारया लाखो फुलांना नमूद न केल्याबद्दल जाहीर माफी मागते . अश्या अजून सुंदर फुलांची आणि त्यांच्यामुळे घडून येणाऱ्या प्रसंगांची वाट मी कायम बघत राहीन.  

वाडा

वाडा - भाग १

                साधारण एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला बांधलेल्या आमच्या वाड्याला आता जवळपास १०० वर्ष पूर्ण होतील . कधीतरी धसलेल्या फर्शीकडे किव्वा वाळवी लागलेल्या कडीपाटाकडे लक्ष्य जायचं. ते तेवढ्यापुरतच.  पण एकेदिवशी  घरातील लोकांमध्ये होत असलेली चर्चा माझ्या कानावर पडली आणि जीव कासावीस झाला. असं जाणवलं की कदाचित हा चिरायू वाडा आता कोणत्याही क्षणी जमीनदोस्त होईल. त्या क्षणी मला काय वाटलं हे शब्दात मांडता येणार नाही. काही गणितं आपल्याला हवीत तशी जुळत नाहीत नाई का. तेव्हा आहे ते मान्य करून पुढे चालावं, हा निव्वळ एक प्रयत्न आहे माझ्या लहानपणीच्या काही आठवणी जोपासण्याचा . आमच्या त्या वाड्यातल्या आठवणी.
               या वाड्यात मी माझ्या आयुष्याची १८ वर्ष अगदी धमाल घालवली. माझ्या आठवणीत ही सगळी वर्ष नाहीत. पण जिथवर आहेत ती मात्र मी इथे मांडण्याचा प्रयत्न करेन.
               आमचा वाडा माझ्या आजोबांच्या आजोबांनी बांधला. तो जेव्हा बांधला गेला तेव्हा पेठेतील सर्वात भव्य आणि उंच असा होता म्हणे. माझ्या आजोबांनी एकदा मला ती गोष्ट सांगताना असं सांगितलेलं आठवतंय की समोरच्या वाडकरांनी त्यांचा वाडा आमच्यापेक्षा उंच दिसावा म्हणून नंतर एक त्रिकोणी असा मनोरा वरच्या मजल्यावर वाढवून घेतला.  पूर्वीचे लोक. असो.  माझे आजोबा जरा शिष्ठ  होते. पेठेतील लोक त्यांना जाम घाबरत. मला पण त्यांची भीती वाटायची. ते दीदीचे मात्र लाड करायचे. माझा काही चुकला की मला अंगठे धरून उभा करायचे. आज्जी माझी लाडकी होती . तिला कमी ऐकू येत असल्याने तिच्या कानात कायम एक यंत्र असायचं . ती फार बोलायची नाही, वेळेवर जेवण आणि ७ च्या बातम्या झाल्या की तिचा दिवस संपला. तिला पत्त्यांच वेड  होतं . एकटी काहीतरी खेळत बसायची. कधी मला हळूच डोळा मारून रम्मी खेळायला बोलवायची. झोपेत मरण आला तिला. पुण्यवान लोकांना असं मरण येतं  म्हणतात.
                  आमच्या वाडयात 5 बिराड राहायची. जसजशी  वर्ष पालटत जायची तशी इथली कुटुंब बदलत राहायची . त्यातील एक खोली होती - विनूच्या आईंची. तिला मी दद्दी म्हणायचे. ती माझी दुसरी आईच होती. तिच्या घरात माझ्यासाठी एक झोळी कायम बांधलेली असायची.  तिच्या दारात एक ५ फूट खोल असा पाण्याचा हौद होता. त्या हौदाची मला आजतागायत भीती वाटते. का कोणासठावूक. संपूर्ण घराच्या बाजूने लागून उजवीकडे घरा एवढ्याच जागेत आमची बाग होती. बागेतूनच वाट होती आणखी एका भाडेकरू च्या घराला.- कुटे मामी. जितके वर्ष मी त्या वाड्यात राहिले तितके वर्ष त्या खोलीत मी भाडेकरू बदललेला पहिला नाही.
             आमच्या ३ मजली मुख्य घराला एकूण १० खोल्या होत्या. खाली ५,वर ४ आणि तिसऱ्या मजल्यावर एकंच. एकत्र कुटुंब असल्या कारणाने प्रत्येकाच्या खोल्या वाटून दिल्या होत्या. मला ४ काका आहेत. पण सगळे नोकरीच्या कारणाने दुसऱ्या गावी स्थायिक झाले होते. म्हणून त्या घरात फक्त आमचं कुटुंब उरलं होतं.  माझ्या बाबांची देखील सरकारी नोकरीमुळे या न त्या गावात बदली व्हायची. म्हणून ते फिरतीवरच असायचे. तसं बघायला गेलं तर त्या एवढया मोठ्या घरात फक्त मी, दीदी, आई, आणि आज्जी आजोबा राहायचो. 
             खालच्या मजल्यावर ४ खोल्या ओळीने होत्या. बाहेरची सोफ्याची खोली, मग देवघर - या देवघरात आईने कधीतरी अशीच रस्त्यावर घेतलेली एक आकर्षक गणपती ची मोठी मूर्ती आहे. माझ्या आई-बाबांची  गणपतीवर मोठी श्रद्धा आहे. त्याची रोज पंचामृताने पूजा केली जाते . मग जात्याची खोली. या खोलीत जातं ठेवायचे, म्हणून याला जात्याची खोली म्हणत. आणि मग स्वयंपाकघर. वरच्या मजल्यावरच्या ४ खोल्यांच्या सोबत एक मोठी गच्ची पसरलेली होती वाड्यातील बिराडांच्या घरावरती. आणि त्या गच्चीच्या मधल्या पोकळीतून वाड्यातील रिकामी जागा दिसायची. गच्चीवरून शेजारच्या किरवेचे पेरू आम्ही लहानपणी तोडायचो. ते तक्रार घेऊन आले की आजोबा मला आणि वाड्यातल्या पोरांना छड्या मारायचे . तिसऱ्या मजल्यावर माझ्या आईबाबांची खोली होती. मला ही खोली फार आवडायची.  आमच्या घराला इतके दरवाजे आणि इतके जिने आहेत की आलेला माणूस गोंधळून जायचा. लपंडाव खेळण्यासाठी यापेक्षा उत्तम जागा मिळणार नाही. दरवाज्यांची  उंची  मात्रं लहान  असल्याने उंच व्यक्तिला वाकून जायला लागायचे . बरेचदा ठन्नकन आपटायचे ही.
              वाड्यातल्या मधल्या रिकाम्या जागेत कित्येक एकत्र जेवणं व्हायची. सगळे मिळून आपापली ताट घेऊन यायचे आणि एकत्र गप्पा मारत जेवण करायचे. आमच्या घरात येतांना कोणी कडी थोकावून किव्वा बेल वाजवून आल्याचं मला आठवत नाही. थेट स्वयंपाकघरापर्यंत वाहिनी अशी आरोळी ठोकत बायका शिरायच्या. सगळे  सण एकत्र  साजरा केले जायचे . दसरा दिवाळी ला माझी आई बागेतील आंब्याची पानं घालून मस्त टपोऱ्या झेंडूच्या फुलांमध्ये ओवून खूप सारे हार बनवायची. प्रत्येक दरवाज्याला हार घातले जायचे . दिव्यांच्या प्रकाशात वाडा लख्खं न्हाऊन निघायचा.
               लहानपणी आमच्या घरात कायम कोणता न कोणता पाळीव प्राणी अथवा पक्षी असायचा. कुत्रा पोपट इत्यादी .एकदा तर माझे बाबा २ ससे पण घेऊन आले होते. मरण पावलेल्या या पाळीव प्राण्यांना आम्ही आमच्या बागेतच पुरायचो. माझ्या अभ्यासाच्या २ जागा होत्या. एक म्हणजे गच्ची, पहाटे उठून मस्त गार हवेत गच्चीवर पुस्तक वाचण्याची मज्जाच वेगळी. आणि दुसरी म्हणजे बाग. भर उन्हात आंब्याच्या किव्वा चाफ्याच्या गर्द सावलीत पोतं टाकून तासंतास मी बसायचे . आमच्या बागेत पेरू ,चिक्कू, डाळींब, आंबा, आवळा, नारळ, बदाम अशी फळं ; आणि  गुलाब, रातराणी, चाफा, मोगरा, निशिगंध, जास्वंद, प्राजक्ता अशी फुलं होती . बागेचं आणि माझं जणू काही एक वेगळं नातंच होतं.
                दीदीचं आणि माझं फारसं पटायचं नाही. डाकू - डाकू खेळतांना ती मला तिच्या टोळीत कधीच घ्यायची नाही. तिने काढलेल्या खोड्या मी कॅलेंडर वर लिहून ठेवायचे आणि शनिवारी बाबा आले की त्यांना वाचून दाखवायचे. आई सांगते की मी एकदा दीदीने मला चिमटा काढला असं देखिल लिहून ठेवलं होतं .ती शिक्षणासाठी पुण्याला गेल्यावर मला आधी मज्जा वाटली की आता मला कोणी ओरडणार नाही, कपाटाचे सगळे कप्पे एकटीला वापरता येतील. पण ती गेल्यावर मला करमेनासं झालं . हळू हळू सवय झाली. आणि मग काही वर्षांनी मी सुध्दा पुण्याला गेले. 
                
वाडा - भाग २
   
               अनेक वर्षं पालटली. आता वाड्यात फारसं जाणं होत नाही. हल्ली  मी वाड्यातील सर्व बिराडांना ओळखत  देखील नाही. दद्दीच्या दारातील हौदावर फरशी टाकलेली असते. जागोजागी जाळ्या झाल्यात. त्या येवढ्या मोठ्या घरात आता फक्तं आई-बाबा असतात. सोबतीला पोपट कुत्री सुध्दा नाहीत. तो  गणपती मात्रं आहे तसा आहे. अखेरपर्यंतचा सोबती. वरचे २ मजले वापरात नाहीत. गच्ची आणि बाग दोन्ही बेवारशी झालेत. पूर्वीचा काळ , पूर्वीची माणसं , पुर्वीचे सण आणि पूर्वीचा वाडा - काहीच उरलं नाही.
               पुढे मागे हा वाडा पाडला जाईल . तिथे एखादी नवीन इमारत उभी राहील. पण आमचा तो वाडा आणि त्या वाड्यातील ती १८ वर्षं माझ्या आठवणीतून कधीच पुसली जाणार नाहीत.