Wednesday, March 19, 2014

फुलं

            लोकांच्या  आयुष्यात प्रसंग येतात . माझ्या आयुष्यात फुलं आली. आणि या फुलांच्या अनुशंगाने प्रसंग आले. इतके की माझ्या आजवरच्या आयुष्यातीलअनेक मोहक प्रसंगांची आठवण मला केवळ या फुलान्मुळेच होते . फूल - एक क्षण डोळे मिटून विचार केला तर तो विचार देखील नकळत नाजूक होऊन जातो नाई.

            चाफा - 
           

            आमच्या बागेत एक चार मजली इमारती इतकं उंच आणि भव्य असं चाफ्याचं झाड होतं. पावसाळ्याचा season आला कि त्याला भरभरून फुलं लागायची . इतकी की झाडावरची पानं दिसेनाशी व्हायची . माझा सकाळी उठल्या उठल्या पहिला कार्यक्रम म्हणजे झाडावर चढून देवपूजेसाठी फुलं काढणे . वाड्यातल्या गोट्याला खाली परडी घेऊन उभा करायचं आणि वरून फुलं फेकायची. अनेकदा आजोबा खालून ओरडायचे - भडवे , अंघोळ न करता फुलं काढू नकोस . पण मी ऐकून न ऐकल्यासारखं करायचे. पुरेशी फुलं काढून झाली की मी तशीच झाडाच्या फांदीवर थोडावेळ बसून रहायचे. उरलेल्या फुलांकडे मन लावून बघत. आईची हाक ऐकू आली की भानावर येउन खाली उतरायचे . नंतर आजोबांनी मोजून केलेल्या फुलांच्या वाटण्या मी वाड्यात प्रत्येकाच्या घरात देऊन यायचे. वर्षभर काही फुलं लागायची नाहीत . त्यामुळे मला असं वाटायचं की त्या चाफ्याच्या झाडाकडे दुर्लक्ष होतंय . म्हणून मी पुस्तक घेऊन त्याच्या फांदीवर बसून अभ्यास करायचे. पोत्याचा वापर करून मी माझं आपलं एक छोटंसं घर त्या चाफ्यावर बांधलं होतं. आज चाफ्याचा वास घेतला कि मला त्या घरात गेल्यासारखं वाटतं. 

            सायली - 
            

           याला जाई जुई चमेली अशी अनेक लोकं अनेक नावं वापरतात. मी मात्र याला सायली म्हणते . आमच्या बागेत एका दरवाज्याच्या आकाराच्या लोखंडाच्या कमानीवर सायलीचा वेल लावला होता . याला  सुध्धा पावसाळ्यात बहर यायचा . हे फूल इतकं काही नाजूक असतं की तोडतांना अलगद बोटांचा वापर करायला लागायचा . सकाळी उठलं की या फुलांचा सडा पडलेलाच असायचा . मग स्वयंपाकघरातून एक ताटली घ्यायची , त्यात फुलं वेचायची , आणि शेजारच्या कुटे मामींकडे देऊन यायची . मी शाळेसाठी तयार होईपर्यंत त्या माझ्यासाठी सायलीचा गजरा ओवायच्या. हा गजरा मी माझ्या छोटाश्या केसांमध्ये पिनेने असा लावायचे कि तो अर्धानिम्मा डोळ्यांवर आला पहिजे. मग सारखी अशी मान उडवत त्याला मागे करायची मला सवय होती . आई सांगते कित्येकदा गजरा नसला की मला शाळेत जाऊ वाटायचं नाही . सायलीचा गजरा दिसला नाही की शाळेतल्या बाई देखील विचारायच्या - आज उठायला उशीर झाला वाटतं ! घरी येईपर्यंत तो कोमेजायचा . पण मला काढवायचा नाही . आज सायली चा वास घेतला की माझी मान नकळत थोडी तिरकी होते आणि मग आजूबाजूच्या लोकांना कळू नये म्हणून मी डोळे मिटून मनातल्या मनात एक झटका देऊन मान उडवते. 

            गुलबक्षी - 
            

            आमच्या पेठेत बऱ्याच लोकांच्या अंगणात गुलबक्षी ची रोपं असायची. आपोआप उगवलेली .त्याच्या काळ्या बिया इकडे तिकडे पडल्या की  ती झुडुपं अजून वाढायची. त्याला पांढरी , गुलाबी, नारिंगी , पिवळी अशी अनेक रंगांची फुलं यायची.  ही फुलं सुवासिक नव्हती पण प्रचंड आकर्षक होती . शेजारच्या रिंकी ने मला सुईदोरा न वापरता त्या फुलांची माळ ओवायला शिकवली होती . रिंकी मला भेटल्या भेटल्या पाठीत दणका देऊन अपिंगो करायची - काहीतरी आमचा लहानपणीचा खेळ . असो ! तर पेठेत फिरून रंगबिरंगी फुलं गोळा करून त्याची सुंदर माळ बनवून मी आमच्या गणपतीला वाहायचे . बाबांना ती माळ फार आवडायची . आजकाल ज्यांच्याकडे गुलबक्षी ची फुलं दिसतात त्यांना मी तशी माळ बनवायला नक्कीच शिकवते.

            सोनटक्का - 
            

            का कोणास ठावूक पण लहानपणी या फुलांना मी 'हत्तीची फुलं' असं म्हणायचे. त्याचा देठ हत्तीच्या सोंडेसारखा लांबसडक असतो म्हणून असावं. लांबड्या हिरव्या देठाच्या टोकाला नाजूक पांढऱ्या पाकळ्या आणि त्याचा वास जणू काही स्वर्गातूनच यायचा. माझ्या शाळेच्या रसत्यात सोनटक्कयाचं एक झाड होतं . ही झाडं फार उंच असतात. म्हणून रसत्यावर पडलेली फुलं उचलण्यापलीकडे माझी मजल जायची नाही . कधी कधी टवटवीत फूल न सापडल्याने मला  गाड्यांच्या चाकाखाली चेम्ब्लेली फुलं उचलल्याच देखील आठवतंय . तो वास माझ्या नाकात असा काही बसलाय की आज ते फूल १० मीटर अंतरावर असलं तरीही मी क्षणातच माझ्या शाळेच्या त्या रस्त्यावर पोचते. 

            रातराणी - 


            म्हणे रातराणी च्या वासाला साप आकर्षित होतो . तसे आमच्या बागेत बर्याचदा साप दिसायचे  . पण म्हणून रातराणी छाटून टाकावी हे काही मला पटलं नव्हतं. यिव्लुस्स ते फूल पण काय त्याच्या वासाची झेप . उन्हाळ्यात गरम व्हायचे म्हणून आम्ही टेरेस वर झोपायचो - चांदणं बघत . त्या बागेतल्या पलीकडच्या कोपऱ्यातून तो रातराणीचा वास पार आमच्या टेरेस वर यायचा . बाबांनी रेदिओ वर लावलेल्या "त्या फुलांच्या गंधकोशी " ऐकत आणि रातराणी चा वास घेत कधी झोप लागायची कळायचंच नाही . आजकाल झोप येत नसेल तर रातराणी आणि आकाशातले तारे यांची मला हमखास कमी भासते.

           या लेखात मी जगभर अस्तिवात असणारया लाखो फुलांना नमूद न केल्याबद्दल जाहीर माफी मागते . अश्या अजून सुंदर फुलांची आणि त्यांच्यामुळे घडून येणाऱ्या प्रसंगांची वाट मी कायम बघत राहीन.  

4 comments:

  1. I still remember bakshish sir and joshi teacher tula chapha anla ka vichrayche.. :) Tu blazer chya pocket madhe chafa thevaychi and vas ghayachi tyacha :) and jar me tujhya ghari asle tar me tula zada var chadun fula kadayla sangayche and ghari gehun jayche :) it was all fun :P

    ReplyDelete
  2. Tyaancha naaw 'Bakshi' sir aahe ga jaade :D

    ReplyDelete
  3. attaparyant Phulancha kadhi etka vichar kela navata...but when you mentioned Chafa, ratrani ani Sayali ...again went back to the memory lane...kahi goshti aplya subconscious mind madhe etkya baslya astaat kee kunitari tyachi athvan karun dete ani then you realize kee arrey hey tar mala pan khoop avdayche ..ani aajchya ya cut-throat world madhe it just slipped off!! Thanks for rekindling those moments :)

    ReplyDelete
  4. I am glad you liked it daadu :-)

    ReplyDelete